रक्तपेढ्यांच्या त्रुटीच्या अर्थकारणावरील उपाय : रक्तसेवेचे नवे सेवामूल्य

दिनांक १ जून २०१४ पासून पुणे शहरातील रक्तपेढ्या, शासनाच्या नव्या आदेशामुळे,  दीर्घ काळच्या आर्थिक जोखडातून मुक्त झाल्या व मोकळेपणाने श्वास घेवू लागल्या आहेत. केंद्र शासनाने २००७ साली निर्धारित केलेले रु. ८५० हे रक्ताचे सेवामूल्य वाढवून नुकतेच रु. १४५० असे नव्याने निर्धारित केले व भारतातील सर्व रक्तपेढ्यांनी मोकळेपणाचा निश्वास टाकला. त्याची अंमलबजावणी पुणे शहरात सुरु झाली व त्याच्या विविध प्रतिक्रिया समाजाकडून उमटू लागल्या. त्यामुळे समाज प्रबोधनासाठी हा लेख लिहिणे आवश्यक झाले.

 कुठलीही “आदर्श रक्तपेढी” ही समाज मंदिरासारखीच असली पाहिजे. ती समाजाने, समाजासाठी उभारलेली,  समाजाचीच रक्तपेढी असली पाहिजे. अशा रक्तपेढीचे सर्वतोपरी भरण पोषण हे समाजानेच केले पाहिजे. ज्याच्याकडे देण्यासारखे जे काही आहे ते त्याने या समाज मंदिरासाठी दिलेच पाहिजे. मानवतेच्या या राष्ट्रीय कार्यासाठी,  ज्याच्याकडे देण्यासाठी “रक्त” आहे,  ज्याच्याकडे “वेळ”,  ज्याच्याकडे “घाम”,  ज्याच्याकडे “धन”, ज्याच्याकडे “ज्ञान”, ज्याच्याकडे “श्रम” असे जे जे काही आहे ते दिले पाहिजे. तरच हे समाज मंदिर समाजाच्या उपयोगी पडू शकेल. कुठल्याही “आदर्श रक्तपेढी”ला या सर्व गोष्टींची सदासर्वदा नितांत गरज असते.

 रक्ताची गरज असलेल्या गरजू रुग्णाला मिठी मारून किंवा त्याला प्रेमाने पोटाशी धरून, अथवा प्रेमभराने त्याच्याशी हस्तांदोलन करून,  रक्तदात्याला रुग्णाची “रक्ता”ची गरज भागवता आली असती तर किती छान झाले असते ! पण दुर्दैवाने असे होत नाही. मिठी मारून त्याने फक्त “सदभावना” रुग्णापर्यंत पोहोचतात ! “रक्त” पोहोचत नाही ! हिंदी सिनेसृष्टी त्याला अपवाद आहे  हे सोडून द्यायचे. कारण व्यवहारात तसे होत नाही.

 मग हे रक्त एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीकडे जाते तरी कसे ? त्याचे सुद्धा एक शास्त्र आहे. त्याला “रक्तपेढी विज्ञान (Immunohaematology/Transfusion Medicine)” असे म्हणतात. पुणेकरांच्या सुदैवाने या विषयाचे पदव्युत्तर शिक्षण देणारी “Armed Forces Medical College” ही एकमेव लष्करी संस्था आपल्याच शहरात आहे. ती भारतीय लष्कराची या विषयातील तज्ञांची गरज भागविण्याचे कार्य करीत आहे. पण संपूर्ण भारतीय समाजाची गरज कोण भागवणार ?  त्यासाठी काही मोजक्या संस्था चंडीगड, जयपुर, लखनौ, मद्रास, मुंबई, जम्मू इ. ठिकाणी कार्यरत आहेत. पण अन्य वैद्यकीय महाविद्यालये या विषयात रस घेत नाहीत. कारण रक्तपेढ्यांचे अर्थकारण त्रुटीचे असल्यामुळे विद्यार्थी या क्षेत्रात पदव्युत्तर शिक्षण घेण्यास नाखूष असतात. त्यामुळे सध्या ती जबाबदारी “Immunohaematology” या विषयाशी तुलनेने जवळ असलेल्या “Pathology”  किंवा “Microbiology” या विषयाचे तज्ञ सांभाळून नेत आहेत. पण आपल्या देशाच्या रक्तसेवेच्या भविष्यात असे दीर्घ काळ चालणार नाही. त्यासाठी आपल्याला या विषयाचे तज्ञ निर्माण करावेच लागतील.

 हे झाले तज्ञांचे ! पण रक्तपेढीत काम करणाऱ्या तंत्रज्ञांचे काय ? त्यांनी सुद्धा “Medical Laboratory Technology”  या विषयातील पदविका व रक्तपेढीच्या कामातील अनुभव घेणे आवश्यक आहे. रक्तपेढी विषयक भारतीय कायदे सुद्धा असेच सांगतात. प्रत्यक्षात काय घडते आहे ?  रक्तपेढ्यांचे अर्थकारण त्रुटीचे असल्यामुळे विद्यार्थी “Medical Laboratory Technology” या विषयात पदव्युत्तर शिक्षण घेण्यास तसेच त्यानंतर रक्तपेढीत काम करण्यास नाखूष असतात. त्यामुळे रक्तपेढ्यांना पुरेसे तांत्रिक मनुष्यबळ देखील मिळू शकत नाही. रक्तपेढीसाठी आवश्यक असलेल्या “परिचारिका” व “समाज सेवक/सेविका” यांची  मनस्थिती सुद्धा थोड्याफार फरकाने अशीच आहे. त्यामुळे बहुतेक सर्व रक्तपेढ्यांचे व्यवस्थापन “अशी” मानसिकता असलेले मनुष्यबळ, केवळ “सेवाभावी वृत्ती”चे आवाहन करून व त्यांच्या आर्थिक गरजांकडे दुर्लक्ष्य करून त्यांना दीर्घकाळ रक्तसेवेमध्ये टिकवून ठेवू शकत नाही. रक्तपेढी चालविणे हे नक्कीच “सेवाकार्य” आहे. पण या कामातील “तांत्रिक मनुष्यबळ” त्यांच्या शिक्षणाचा विचार  करून, रक्तपेढीच्या कामाकडे  “व्यावसायिक कार्य” म्हणूनच पहातो व त्यामुळे रक्तपेढ्यांच्या व्यवस्थापनाची चांगलीच तारांबळ उडते. एका बाजूला रक्तदाता मी “सेवाभावा” ने निरपेक्षपणे “विनामूल्य” रक्तदान केले असे म्हणतो तर दुसऱ्या बाजूला रक्तपेढीचे “तांत्रिक मनुष्यबळ” मी शिक्षण “व्यवसाय” करण्यासाठी घेतले;  “विनामूल्य सेवा” देण्यासाठी नाही,  अशी मानसिकता बाळगून असतो. त्यामुळे रक्तपेढ्यांचे व्यवस्थापन चांगलेच आर्थिक कात्रीत सापडते.

 “रक्तपेढ्यांच्या त्रुटीच्या अर्थकारणा” चे “तांत्रिक मनुष्य बळाची मानसिकता”  हे कारण पाहिल्यानंतर आता आपण “रक्तपेढ्यांच्या त्रुटीच्या अर्थकारणा” च्या अन्य कारणांकडे वळू या. त्यामधील सर्वात खर्चिक काम म्हणजे रक्तपेढीची उभारणी ! त्यासाठी रक्तपेढीबाबत भारतीय कायद्यातील(Drugs & Cosmetics Act ,१९४०) तरतुदीनुसार, किमान १६०० चौ. फूट जागा तांत्रिक कामासाठी,  पण प्रत्यक्षात तेवढीच जागा बिनतांत्रिक कामासाठी,  अशी एकूण ४००० चौ. फूट जागा व त्यातील बराच मोठा भाग वातानुकुलीत करणे आवश्यक आहे. या कायद्यानुसार आवश्यक असलेले फर्निचर व उपकरणे यांचाच खर्च काही कोटींच्या घरात जाणारा आहे. या सर्वांची देखभाल,  त्यावर भरावे लागणारे विविध कर,  उपकरणांची कार्यसिद्धता तपासण्यासाठी करावा लागणारा खर्च इ. गोष्टींचा विचार केंद्र शासनाने जाणून बुजून रक्ताचे सेवामूल्य ठरविताना केलेला नाही. कारण तसे केले तर सर्व सामान्य भारतीय नागरिकाला “रक्त” प्राप्त करून घेणे केवळ अशक्य होईल. रक्ताचे जेवढे सेवामूल्य(रु.१४५०) आता शासनाने निर्धारित केले आहे त्याच्या काही पट अधिक केवळ रक्तपेढीच्या उभारणीचाच खर्च आहे. बहुतेक प्रगत देशात हा खर्च शासन किंवा रेडक्रॉस सारख्या आंतरराष्ट्रीय सामाजिक संस्था करीत असतात. आपल्या देशात सुद्धा अशा काही मोजक्या संस्था आहेत. पण त्या हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच !

 रक्तपेढी चालविण्यासाठी एवढे मोठे खर्च असताना, केंद्र शासनाने एवढे कमी(रु. १४५०) सेवामूल्य ठरविले तरी कसे ?  यासाठी आपण सर्व पुणेकरांनी,  नागपूरच्या रक्तपेढ्या, महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री,  महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमण परिषद(S.B.T.C.),  केंद्रीय रक्त संक्रमण परिषद(N.B.T.C.),  महाराष्ट्राच्या आरोग्य खात्यातील वैद्यकीय शिक्षण व सार्वजनिक आरोग्य विभाग,  अन्न व औषध प्रशासन विभाग, महाराष्ट्रात रक्तपेढ्या चालविणाऱ्या अनेक संस्था,  अशा एक ना अनेक संस्था व असंख्य व्यक्तींचे अनेक वर्षांचे परिश्रम कारणीभूत आहेत याची जाण ठेवून,  त्यांचे उतराई असले पाहिजे. या सर्वांनी “आम आदमी” ची जाण ठेवून फक्त आवर्तीत खर्चाचा(Recurring expenses) विचार करून रु. १४५० हे रक्ताचे नवे व “कमीत कमी” असे सेवामूल्य निर्धारित केले आहे.

 पुणेकरांना “अधिक सुरक्षित रक्त” मिळावे यासाठी “अधिक प्रगत तंत्रज्ञान” याची कास पुण्यातील काही रक्तपेढ्यांनी धरल्यामुळे आपल्या शहरातील काही रक्तपेढ्यांचे आवर्तीत खर्च(Recurring expenses) सुद्धा, केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या(रु.१४५०) सेवामूल्यापेक्षा जास्त आहेत. पुणेकरांच्या सुदैवाची गोष्ट अशी की केंद्र शासनाने या “अधिक प्रगत तंत्रज्ञान” वापरण्याला व त्यावरील वाढीव खर्चालादेखील मान्यता दिलेली असल्यामुळे आपल्याला “अधिक सुरक्षित रक्त” थोडा अधिक खर्च करून प्राप्त होणार आहे.  त्यामुळे माझे सर्व पुणेकरांना असे नम्र आवाहन आहे की,  आपल्या रक्ताच्या गरजेच्या वेळी  “समजून-उमजून” योग्य त्या तंत्रज्ञानाची व ते वापरणाऱ्या रक्तपेढीची निवड करा व आपण भरत असलेल्या “अधिक” सेवामूल्याचा अर्थ समजावून घ्या. त्याचप्रमाणे जर सेवामूल्यामध्ये काही आर्थिक सवलत मिळत असेल तर त्याचेही कारण समजावून घ्या. डोळस व शहाण्या पुणेकरांना अधिक सांगणे “न लगे” !   

केंद्र शासनाने निर्धारित केलेल्या रक्ताच्या या नव्या सेवामूल्याचे आपण सर्व पुणेकरांनी स्वागत करू या व एक उत्तम दर्जाची रक्तसेवा कशी असावी याचे एक उत्तम उदाहरण आपण संपूर्ण भारत देशाला घालून देऊ या.

 

डॉ. दिलीप बाळकृष्ण वाणी (एम. डी.)

अध्यक्ष

अखिल भारतीय रक्तपेढी संघटना

महाराष्ट्र शाखा   

 

जगातील सर्वात सुरक्षित रक्ततपासणीचे तंत्रज्ञान – नॅट

 

केरळमध्ये नुकतीच घडलेली एक घटना. एक ८ वर्षे वयाची मुलगी. थॅलेसेमियाने पीडित असलेल्या या मुलीस वयाच्या दुसऱ्या वर्षापासून दर पंधरवड्यास एक रक्तपिशवी स्वत:च्या शरीरात भरून घ्यावी लागत असे. वायनद जिल्ह्यातील दोन सरकारी रुग्णालयांतून हे रक्तसंक्रमण केले जाई. गेल्या सप्टेंबरमध्ये या मु्लीच्या रक्ताची चाचणी केली असता ही मुलगी एच.आय.व्ही.बाधित झाल्याचे लक्षात आले आणि तिच्या घरातील मंडळींना धक्काच बसला. नंतर घरातील सर्वांच्या चाचण्या केल्या असता सर्वजण एच.आय.व्ही. निगेटीव्ह आढळले. त्यामुळे नजिकच्याच काळात केलेल्या रक्तसंक्रमणामुळे कुणाचे तरी एच.आय.व्ही.बाधित रक्त या मुलीस दिल्याने या छोट्या मुलीला या घातक संसर्गाची बाधा झाली हे स्पष्ट झाले. अर्थात काहीही अपराध नसताना या मुलीच्या आयुष्यावर मात्र एक कायमस्वरुपी प्रश्नचिन्ह लागले.

सुरक्षित रक्तसंक्रमणाची निकड

वैद्यकीय उपचारांदरम्यान अनेक गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया करीत असताना रक्त व रक्तघटकांची उपलब्धता जितकी महत्वाची आहे तितकीच या रक्तघटकांची सुरक्षितताही अत्यंत महत्वाची आहे. सामान्यत: एका रक्ताच्या पिशवीपासून तीन रक्तघटक तयार करता येतात म्हणजेच एका रक्तदात्याने दिलेल्या रक्ताचा उपयोग तीन रुग्णांना होऊ शकतो. परंतू हेच रक्त जर सुरक्षित नसेल म्हणजे प्राणदान हे खरे असले तरी ते प्रत्यक्षात तसे होण्यासाठी रक्त सुरक्षित असणे हे अत्यावश्यक आहे. यासंदर्भात सुरक्षित रक्त म्हणजे नेमके काय हे समजून घेणे अगत्याचे ठरेल. प्रत्येक रक्तदात्याने दिलेल्या रक्तावर ते रक्त साठवून ठेवण्यापूर्वी काही आवश्यक चाचण्या कराव्याच लागतात. या चाचण्या म्हणजेच रक्तामधून एच.आय.व्ही., हिपेटायटीस बी, हिपेटायटीस सी, मलेरिया, सिफ़िलिस इ. घातक संसर्ग होऊ नयेत याकरिता करावयाच्या चाचण्या होत. या चाचण्यांना वैद्यकीय परिभाषेत ट्रान्सफ़्युजन ट्रान्समिटेड इन्फ़ेक्शन्स (TTI) असे म्हटले जाते.

 रक्त सुरक्षित करण्याची प्रचलित पद्धत व त्याची मर्यादा

सध्या वरील चाचण्या ’एलायजा’ (ELISA) नावाच्या तंत्राने केल्या जातात. वरीलपैकी कुठल्याही प्रकारचा विषाणू रक्तदात्याच्या शरीरात शिरला असेल तर त्या विषाणूचा प्रतिकार करण्यासाठी शरीरात प्रतिकारके (antibodies) निर्माण होतात, या प्रतिकारकांचा शोध घेऊन या विषाणूचे अस्तित्व ओळखण्याचे काम एलायजा या तंत्राव्दारे केले जाते. मात्र विषाणूने प्रवेश केल्यानंतरही अशी प्रतिकारके शरीरात तयार होण्याकरिता काही कालावधी लागतो. या मधल्या काळात शरीरात विषाणू तर आहे पण त्याला प्रतिकार करण्याकरिता प्रतिकारके मात्र निर्माण झालेली नाहीत अशी परिस्थिती उत्पन्न होते. या कालावधीस ’विंडो पिरियड’ (window period) असे म्हटले जाते. या विंडो पिरियडमध्ये एलायजा तंत्राने विषाणूचे अस्तित्व ओळखता येऊ शकत नाही. अर्थातच विंडो पिरियडमध्ये असणाऱ्या रक्तदात्याने रक्तदान केल्यास एलायजा तंत्रज्ञानाच्या या मर्यादेमुळे या रक्तातील विषाणू ओळखता येणे शक्य होत नाही. असे विषाणू न ओळखता आलेले रक्त अथवा रक्तघटक रुग्णाला दिल्यास तो रुग्ण त्या त्या संसर्गाचा शिकार होऊ शकतो. सध्या भारतामध्ये अन्न व औषध प्रशासनाने दिलेल्या निर्देशांनुसारही एलायजा तंत्रानेच रक्ततपासणी करणे बंधनकारक आहे, परंतू एलायजा तंत्राची वर उल्लेखिलेली मर्यादा ही आहेच. लेखाच्या सुरुवातीला उल्लेख केलेली घटना ही तर रितसर नोंदणी झालेली घटना आहे. या घटना सातत्याने वाढताना दिसत आहेतच परंतू अशी घटना होऊनसुद्धा दडपण्याच्या हेतुने नोंदच केली गेली नाही अशाही अनेक घटना असण्याची दाट शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर नॅट सारख्या तंत्रज्ञानाचे महत्व लक्षात घ्यायला हवे.

नॅट म्हणजे काय ?

नॅट म्हणजे ’न्युक्लिक ऍसिड टेस्ट’ (NAT – Nucleic Acid Test). आताच्या घडीला जगातील सर्वांत सुरक्षित असणारी रक्ततपासणीची पद्धत म्हणजे नॅट होय. नॅट तंत्रज्ञानाच्या सहाय्याने विषाणूंना प्रतिकार करणाऱ्या प्रतिकारकांऐवजी थेट रक्तात संसर्गित झालेल्या विषाणूंची जनुकेच (DNA & RNA) शोधून काढली जातात. एखादा रक्तनमुना विषाणूबाधित नाही हे ठरविण्याकरिता या तंत्रज्ञानाच्या सहाय्याने तो एक रक्तनमुना सुमारे ४० ते ५० वेळा ऍंप्लिफ़िकेशन करुन त्यात विषाणू नसल्याची खातरजमा केली जाते. अर्थातच त्यामुळे ’विंडो पिरियड’ लक्षणीयरित्या कमी होतो आणि रुग्णास रक्तसंक्रमणातून एच.आय.व्ही., कावीळ इ. होण्याचा धोका व्यावहारिक पातळीवर नष्ट होतो. एलायजा व नॅटचा ’विंडो पिरियड’च्या आधारावर तुलनात्मक अभ्यास केल्यास पुढील निष्कर्ष निघतात –

        तपासणी पद्धत

                       संसर्ग

विंडो पिरियड – एलायजा

विंडो पिरियड – नॅट

एच.आय.व्ही.

 

२५ दिवस

५ दिवस

हिपेटायटीस बी

 

६० दिवस

२० दिवस

हिपेटायटीस सी

 

७५ दिवस

५  ते ७ दिवस

 

 

 

 

 

 

 

 

 

वरील निष्कर्षांवरुन हे सहज लक्षात येऊ शकेल की, नॅट तंत्रज्ञानाव्दारे अतिशय कमी कालावधीमध्ये व अचूकतेने विषाणूसंसर्ग निश्चित केला जातो.त्यामुळे अर्थातच रक्त व रक्तघटकांची सुरक्षितता कित्येक पटींनी वाढते.

पश्चिम महाराष्ट्रातील पहिली स्वयंचलित नॅट प्रयोगशाळा नुकतीच पुण्यातील जनकल्याण रक्तपेढीमध्ये सुरु झाली आहे. संपूर्णपणे स्वयंचलित असलेल्या या तंत्रज्ञानामुळे मानवनिर्मित त्रुटी पूर्णपणे टाळल्या जातात. अमेरिका, इंग्लंड व अशा इतर प्रगत देशांमध्ये रक्तदात्याचे रक्त नॅट तंत्रज्ञानाव्दारेच तपासले जाते. या सर्व देशांमध्ये नॅट तपासणी सरकारनेच बंधनकारक केली आहे. ही चाचणी १०० ट्क्के राबविल्या्पासून या देशांमध्ये रक्तसंक्रमणाव्दारे बाधा झालेला एकही रुग्ण आढळलेला नाही. म्हणजेच व्यावहारिक पातळीवर हे पूर्णत: सुरक्षित रक्तच म्हटले पाहिजे.

भारतामध्ये मुळातच नॅट प्रयोगशाळांची संख्या मोजकी आहे. त्यामुळे सरकारी पातळीवरुन नॅट अद्याप बंधनकारक करण्यात आलेले नाही. पण तरीही आज पुण्यामध्ये या तंत्रज्ञानाव्दारे तपासलेले रक्त अर्थात जगातील सर्वात सुरक्षित रक्त आता उपलब्ध झाले आहे.

गेल्याच वर्षी जनकल्याण रक्तपेढीने ’स्वामी विवेकानंद’ यांच्या १५० व्या जयंती वर्षानिमित्त रक्तपेढीशी संबंधित सर्व क्षेत्रांमध्ये अनेक उपक्रम यशस्वीपणे राबविले. “पाश्चात्त्यांकडील तंत्रज्ञान आणि पौर्वात्यांची संस्कृती यांचा मिलाफ़ होऊन नवीन विश्वाची निर्मिती झाली पाहिजे” असे स्वामीजी नित्य म्हणत असत. गेली ३० वर्षे सामाजिक बांधिलकी सातत्याने जपत आणि वेळोवेळी नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करणाऱ्या रक्तपेढीने स्वामी विवेकानंद सार्ध शती वर्षातच रक्तसुरक्षिततेसाठी इथे सुरु केलेली नॅट तंत्रज्ञानाने युक्त अशी प्रयोगशाळा म्हणजे स्वामीजींना दिलेली एक मानवंदनाच आहे असे म्हटले तर ते वावगे ठरु नये.